छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राधाकृष्ण विहार परिसरात मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीला सुरक्षितपणे घरी सोडण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर चौघांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (११ ऑगस्ट) पहाटे घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सुवर्णा भगवान देशमुख (वय ३५, रा. सातारा परिसर, देवळाई चौक) यांनी
फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास राजू स्वामी यांनी विजयानंद नावाच्या व्यक्तीला मद्यधुंद अवस्थेत देशमुख यांच्या घरासमोर सोडले. त्यानंतर सुवर्णा देशमुख व त्यांच्या पतीने संबंधित व्यक्तीला दुचाकीवरून त्याच्या राधाकृष्ण विहार येथील घरी सुरक्षित पोहोचविले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या राजू स्वामी, संजू स्वामी, प्रथमेश स्वामी आणि उषा जाधव यांनी विजयानंदला दारू पाजून आणल्याचा आरोप करत वाद घातला. यानंतर
चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. राजू स्वामी यांनी लोखंडी पट्टीने सुवर्णा देशमुख यांच्या डोक्यावर व पायावर वार केल्याचा, तर संजू स्वामी यांनी ब्लेडने हातावर जखम केल्याचा आरोप आहे. तसेच प्रथमेश स्वामी व उषा जाधव यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. देशमुख यांच्या पतीलाही बेल्टने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. सोळुंके करीत आहेत.












